गाझियाबाद- शैक्षणिक संस्थेच्या आवारात गोळीबाराची आणखी एक घटना काल झाली. गाझियाबाद जवळच्या एका गावातील महाविद्यालयाच्या आवारात दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या गोळीबारात बारावीच्या एका विद्यार्थ्याला प्राण गमवावे लागले.
विपिन नावाच्या या 19 वर्षीय विद्यार्थ्याला त्याच्याच दोन वर्गमित्रांनी गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडून मारल्याचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक दीपक रतन यांनी सांगितले. महाविद्यालयातील सर्व वर्ग सुटून विद्यार्थी घरी परत जात असताना दुपारी एकच्या सुमारास ही घटना झाली. याप्रकरणी अतार सिंग नावाच्या एका आरोपीला अटक झाली आहे तर दुस-याला अद्याप अटक झालेली नाही.
अतार सिंगच्या बहिणीची विपिनने छेड काढली होती आणि अतार सिंगने त्याचा बदला घेण्यासाठी गोळ्या झाडल्या असाव्यात, असा संशय पोलीस अधिक्षक (ग्रामीण) जगदीश शर्मा यांनी व्यक्त केला. याआधीही अतार सिंगने विपिनला अनेकदा बहिणीची छेड काढू नकोस असा इशारा दिला होता, असे ते म्हणाले.
गुरगवा येथील एका उच्चभ्रू मुलांच्या शाळेत आठव्या इयत्तेतील दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या एका वर्गमित्रावर गोळ्या झाडल्याचा प्रकार गेल्या 11 डिसेंबर रोजी घडला होता.