न्यूयॉर्क - स्वच्छ मुंबई हरित मुंबई आणि यासारख्या अनेक लोकप्रिय घोषणा आणि केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन स्वच्छ मुंबईसाठी उत्साहाच्या भरात योजना राबवणा-या आपल्या नेत्यांना सणसणीत चपराक लगावत मुंबईने जगातील सर्वाधिक गलिच्छ शहरांमध्ये सातवा क्रमांक पटकावला आहे. सर्वात गलिच्छ शहरांमध्ये राजधानी दिल्लीही मागे नसून तिने या यादीत काहीसे सन्मानजनक 24 वे स्थान मिळवले आहे.
अमेरिकेतील फोर्ब्स या व्यवसायविषयक नियतकालीकाने नुकतीच जगातील गलिच्छ आणि स्वच्छ शहरांची यादी जाहीर केली. त्यात पहिल्या 25 गलिच्छ शहरांत मुंबई व दिल्ली या अनुक्रमे व्यावसायिक आणि राजकीय राजधान्यांनी आपले स्थान पटकावले आहे. बंगलोरसह चार महानगरांनी मात्र देशाची काहीतरी अब्रू राखत पहिल्या 20 सुंदर शहरांमध्ये स्थान मिळवले आहे.
मुंबईत आजघडीला पायाभूत सुविधा, प्रदूषण नियंत्रण आणि आर्थिक विकासासाठी तब्बल एक अब्ज डॉलर्सचे प्रकल्प राबवले जात असताना मुंबईने पटकावलेला हा क्रमांक उल्लेखनीय आहे.
या मासिकात ओरीसातील सुकींदा आणि गुजरातमधील वापी शहरे ही सर्वाधिक प्रदूषित असल्याचे दिसून आले आहे.
सर्वाधिक गलिच्छ शहराचा मान अझरबैजानमधील बैकूचा तर दुसरा क्रमांक बांग्लादेशातील ढाक्याचा लागला आहे.