मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिनेता अमिताभ बच्चनविरुद्ध छेडलेल्या मोहिमेने पुन्हा डोके वर काढले आहे. या वेळी मनसेने पोस्टर्सच्या माध्यमातून अमिताभ बच्चन यांची टर उडवली आहे. पुणे जिल्ह्यातील जमिनीचे दानपत्र मागे घेण्याच्या बच्चन यांच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ही पोस्टर्स लावण्यात आली होती.
मनसेने मुंबईत जागोजागी लावलेल्या पोस्टर्समध्ये अमिताभ बच्चन यांच्या नावाचा प्रत्यक्ष उल्लेख केलेला नसला तरी त्याचा हेतू स्पष्ट होईल याची काळजी घेतलेली आहे. "माझे दान परत करा" असे म्हणणा-या एका व्यक्तीचे रेखाचित्र या पोस्टरवर आहे. रेखाचित्राजवळ "सुपरस्टार शेतकरी" असे लिहिलेले आहे.
मनसेने काल रात्री दादर परिसरात ही पोस्टर्स लावली होती. मात्र आज सकाळी ही पोस्टर्स गायब होती. पोलिसांनी ती काढून टाकल्याचा मनसेच्या कार्यकर्त्यांचा दावा आहे.
ही पोस्टर्स लावून अमिताभ बच्चन यांची टर उडविण्याचा मनसेचा हेतू नाही, असे मनसे प्रवक्त्यांनी सांगितले. " जर एखादा सुपरस्टार शेतकरी होऊ इच्छित असेल तर देशात शेतक-यांना चांगले दिवस आले आहेत असे समजायला हरकत नाही. कदाचित शेतक-यांच्या आत्महत्याही आता थांबतील. यामुळे आम्हाला झालेला आनंद व्यक्त करण्यासाठी ही पोस्टर्स लावली होती," असे त्यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जमीन तिचे मूळ मालक असलेल्या शेतक-यांना दान करण्यासाठी सरकारजमा करण्याचे इरादापत्र अमिताभ बच्चनने सादर केले होते. मात्र हे इरादापत्र विनाअट मागे घेत असल्याचे पत्र अमिताभ बच्चन यांनी मावळ तालुक्याच्या उपविभागीय अधिका-यांना लिहिले आहे.
अमिताभ बच्चन यांच्यावर टीकास्त्र सोडण्याची मनसेची ही दुसरी वेळ आहे. बच्चन यांच्या निष्ठा महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशला अधिक प्रमाणात वाहिलेल्या आहेत, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात केला होता.
Source :
PTI