भारत फोर्जची महाराष्ट्रात साडेतीन अब्जांची गुंतवणूक
Thursday, March 27, 2008 18:01 [IST]
मुंबई - बारामती येथे अत्याधुनिक पोलाद उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी भारत फोर्ज व महाराष्ट्र सरकार यांच्यात आज एका सामंजस्य करारावर स्वाक्ष-या झाल्या. या केंद्रासाठी सुमारे 10 एकर जमिनीवर साडेतीन अब्ज रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. या केंद्राची फोर्जींग क्षमता दरसाल 30 हजार टन असेल तर बाराशे कुशल कामगारांना या ठिकाणी रोजगाराची संधी मिळणार आहे.
या प्रकल्पातून विमान, जहाज, रेल्वे, ऊर्जा, खाण आणि बांधकाम क्षेत्रासाठी लागणा-या जागतिक दर्जाच्या साधनांची निर्मिती केली जाणार आहे.
या प्रकल्पामुळे केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांचे गाव बारामती जागतिक नकाशावर येईल, अशी माहिती मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिली. राज्य सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे महाराष्ट्राने आपली गेलेली पत पुन्हा मिळवली असून गुंतवणुकदारांसांठी महाराष्ट्र पुन्हा आकर्षण ठरत आहे, असे उद्योग मंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
कल्याणी उद्योगसमूहाची भारत फोर्ज ही आघाडीची कंपनी आहे.