मुंबई - राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त नंदलाल यांना गुरूवारी दोन दिवस दिवाणी कारावासाची शिक्षा विधानसभेने ठोठावली. विधीमंडळाचा हक्कभंग केल्याचा आरोप नंदलाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राज्याच्या विधीमंडळ इतिहासात निवडणूक आयुक्तांना शिक्षा देण्याचा प्रसंग पहिल्यांदाच घडला आहे.
नंदलाल यांनी महापौर, उपमहापौर, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष- उपाध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती-उपसभापती यांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारच्या विरोधात आदेश काढला होता. त्यामुळे सभागृहाचा अवमान झालेला आहे, असा मुद्दा उपस्थित करून सात मार्च २००६ रोजी कॉंग्रेसचे सदस्य जनार्दन चांदूरकर यांनी नंदलाल यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. तो प्रस्ताव विधानसभेच्या विशेष हक्क समितीकडे विचारविनिमयासाठी गेला होता.
समितीचे प्रमुख चंद्रकांत छाडेड यांनी विधानसभेत अहवाल सादर केला. नंदलाल यांना सात दिवसांची दिवाणी कारावासाची शिक्षा द्यावी, अशी शिफारसही त्यांनी केली. या शिक्षेवर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. राज्य सरकारने सूडबुद्धीने हा निर्णय घेतल्याचे भाजपा सदस्यांनी सांगितले.
नंदलाल यांनी मात्र मी माझे काम चोख केले असल्याचे सांगत ही शिक्षा स्वीकारण्याची तयारी दर्शवली. नंदलाल यांना अटक करण्यात आली आहे.