नवी दिल्ली- जागतिक अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू असली तरी सुवर्णकाळ म्हणावा असा काळ अद्याप यायचा आहे, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. पुढील 50 वर्षांचा काळ हा अधिक उत्पादनक्षम असेल, असे ते म्हणाले. अर्थात हा सुवर्णकाळ आणण्यासाठी भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान परदेशी पत्रकारांच्या एका गटाशी संवाद साधत होते.
भारताची लोकसंख्या एक अब्जांहून अधिक आहे आणि या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आहे. मात्र तरीही भारत नेहमीच एक नागरी समाज राहिला आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. एक खुला समाज आणि राज्यव्यवस्था राहिल्याबाबत भारताला अभिमान आहे, असे ते म्हणाले.
भारताची वाढती लोकसंख्या हे नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे पण तरीही भारतीय समाजात मानवी हक्क आणि कायद्याचे संरक्षण होते, असे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.