कोलकाता- वाढत्या महागाईला आळा घालण्यातील अपयश आणि जनतेच्या विरोधातील धोरणे यांबद्दल संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारवर कोरडे ओढत तिस-या आघाडीचा पर्याय तयार करणे आवश्यक असल्याचे मत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने व्यक्त केले आहे. पक्षाच्या कोइंबतूर येथे उद्यापासून सुरू होणा-या परिषदेत या मुद्दयावर चर्चा होणार आहे.
कॉग्रेस प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे तर भाजपा प्रणित सरकारमुळे देशात जातीयवादी सत्ता येण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत तिस-या आघाडीचा पर्याय तयार करणे अत्यावश्यक आहे, असे पक्षाच्या पोलिट ब्युरोचे सदस्य तसेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचारजी यांनी डाव्या पक्षांच्या एका रॅलीला उद्देशून केलेल्या भाषणात सांगितले. त्रिपुरा विधानसभा निवडणुकांमध्ये डाव्या पक्षांनी मिळविलेले यश साजरे करण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली होती.
अयोग्य धोरणांमुळे भूतकाळात झालेल्या चुकांपासून शिकण्याचा सल्ला डाव्या पक्षांनी वेळोवेळी देऊनही संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे भट्टाचारजी यांनी सांगितले. भाजपा प्रणित आघाडी सत्तेवर येणेही देशाच्या सेक्युलर धोरणांसाठी घातक आहे. त्यामुळे तिस-या आघाडीचा पर्याय निर्माण झालाच पाहिजे, असे ते म्हणाले. यासाठी देशभरातील डाव्या पक्षांना एकत्र आणून राजकीयदृष्ट्या प्रबळ बनवावे लागेल, असेही भट्टाचारजी यांनी नमूद केले.
संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने किमान सामाईक कार्यक्रम धुडकावून लावत बहुराष्ट्रीय कंपन्यांना सर्व दारे उघडल्याचा आरोप त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सरकार यांनी या वेळी केला. केंद्र सरकार अमेरिकेचा संयुक्त भागीदार बनण्याच्या प्रयत्नात आहे ही बाब अणुकराराच्या प्रकरणातूनच स्पष्ट होत असल्याचे सरकार म्हणाले.