चेन्नई- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात येथील एम. ए. चिदंबरम मैदानावर खेळल्या जाणा-या क्रिकेट कसोटी सामन्याच्या आजच्या तिस-या दिवशी दक्षिण आफ्रिकेच्या धावांच्या डोंगराला प्रत्युत्तर देताना भारताने दमदार द्विशतकी सलामी दिली. सलामीवीर विरेंद्र सेहवागने शानदार द्विशतक झळकाविले आहे. कसोटी सामन्यांमध्ये सहसा बघायला न मिळणारी तडाखेबंद फटकेबाजी करत त्याने केवळ 194 धावांत द्विशतक पूर्ण केले. कसोटी इतिहासातील हे तिस-या क्रमांकाचे सर्वात वेगवान द्विशतक आहे. सेहवागने 32 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने द्विशतक पूर्ण केले. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील हे चौथे द्विशतक आहे.
दुसरा सलामीवीर वसिम जाफरनेही सेहवागला उत्तम साथ देत 73 धावा फटकावल्या. जाफर बाद झाल्यानंतरही सेहवागने धावांचा रतीब चालूच ठेवत द्विशतक पूर्ण केले आहे.
ऑस्ट्रेलिया दौ-यामध्ये चांगल्या सलामीचा अभाव ही भारतासाठी डोकेदुखी ठरली होती. या सामन्यात मात्र सलामीवीरांनी मागचे अपयश धवून काढण्यासाठी कंबर कसली. सेहवाग आणि जाफरने 213 धावांची सलामी दिली.
चहापानापर्यंत भारताने तीनशे धावांचा टप्पा ओलांडला होता. सेहवाग 218 धावांवर तर माजी कर्णधार राहुल द्रविड दहा धावांवर खेळत होता.