मुंबई- महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त नंदलाल यांची आज आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली. विशेषाधिकार भंग केल्याबाबत नंदलाल यांना राज्य विधीमंडळाने दोन दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्यांना काल अटक झाली होती. राज्याच्या विधीमंडळ इतिहासात निवडणूक आयुक्तांना शिक्षा देण्याचा प्रसंग पहिल्यांदाच आला आहे.
नंदलाल यांनी महापौर, उपमहापौर, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषदांचे अध्यक्ष- उपाध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती-उपसभापती यांच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारच्या विरोधात आदेश काढला होता. त्यामुळे सभागृहाचा अवमान झालेला आहे, असा मुद्दा उपस्थित करून सात मार्च २००६ रोजी कॉंग्रेसचे सदस्य जनार्दन चांदूरकर यांनी नंदलाल यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला होता. तो प्रस्ताव विधानसभेच्या विशेष हक्क समितीकडे विचारविनिमयासाठी गेला होता.
समितीचे प्रमुख चंद्रकांत छाजेड यांनी विधानसभेत अहवाल सादर केला. नंदलाल यांना सात दिवसांची दिवाणी कारावासाची शिक्षा द्यावी, अशी शिफारसही त्यांनी केली होती. या शिक्षेवर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. राज्य सरकारने सूडबुद्धीने हा निर्णय घेतल्याचे भाजपा सदस्यांनी सांगितले.
दरम्यान, विधीमंडळाने संमत केलेल्या शिक्षेच्या आदेशाला नंदलाल यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.