धरमशाला- चीनने तिबेटची राजधानी ल्हासा येथे तैनात केलेले लष्कर परत बोलाविले आहे, असे तिबेटच्या हद्दपार सरकारने आज सांगितले. तिबेटच्या स्वायत्ततेची मागणीकरणा-या आंदोलकांनी दडपून टाकण्यासाठी तैनात केलेले लष्कर चीन सरकारने बुधवारी परत बोलावले, असे हद्दपार सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
चीन सरकारने लष्कर परत बोलाविले असले तरी जनसुरक्षा कार्यालय आणि अन्य विधी प्रवर्तक संस्था ल्हासामध्ये सक्रिय आहेत, असे प्रवक्त्यांनी नमूद केले.
तिबेटच्या स्वायत्ततेची मागणी करणा-या आंदोलकांनी माजविलेल्या हिंसाचारात 22 नागरिक ठार झाल्याचा चीन सरकारचा दावा आहे. त्याचप्रमाणे चिनी पोलिसांच्या गोळीबारात सुमारे 140 जण ठार झाल्याचे खात्रीलायक वृत्त असल्याचा हद्दपार तिबेटी सरकारचा दावा आहे. ठार झालेल्यांपैकी बहुतांश तिबेटी आंदोलक आहेत, असाही हद्दपार सरकारचा दावा आहे.