मुंबई - आतापर्यंत आपल्याला विविध उद्योगसमूहांचे विलीनीकरण ठाऊक होते. हे विलीनीकरण विकासाच्या दृष्टीने आवश्यकही असते. मात्र आता एका नवीन विलीनीकरणाने मात्र देशाच्या सुरक्षायंत्रणेची झोपच उडवली आहे. मुंबईतील 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेचा मुख्य आरोपी आणि विविध देशविघातक कारवायांसाठी कुप्रसिद्ध असणा-या कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या डी - गँगचे आता पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर - ए - तोएबामध्ये विलीनीकरण झाले आहे. या विलीनीकरणानंतर दाऊदच्या या टोळीचा मुख्य उद्देश धर्माच्या नावावर देशातील जनतेच्या भावनांना चिथावणी देणे आणि भारतविऱोधी कारवाया करणे हा राहील.
हे विलीनीकरण करण्यात पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने प्रमुख भूमिका बजावल्याची चर्चा आहे. हे विलीनीकरण देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोकादायक असल्याचे मत भारतीय गुप्तचर संघटनेच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले.
डी कंपनीवर आयएसआयचा फार पूर्वीपासून वरदहस्त आहे. 1993 च्या बॉम्बस्फोटांना अंतिम रूप देण्यात आयएसआयने मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतरही दाऊदला विविध देशविघातक कारवायांसाठी आयएसआय रसद पुरवित आली आहे.