चेन्नई - सलामीवीर विरेंदर सेहवागने शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर अभूतपूर्व हल्ला चढवत आपले त्रिशतक अवघ्या 278 धावांत पूर्ण करून 75 वर्षांपूर्वीचा इंग्लंडच्या वॉल्टर हेल्मंड यांचा विक्रम मोडीत काढला. कसोटी क्रिकेटमध्ये दोन त्रिशतके झळकावणा-या फलंदाजांपैकी सेहवाग आता तिसरा फलंदाज ठरला आहे. आपल्या त्रिशतकी खेळीत त्याने 41 चौकार व पाच षटकारांची बरसात केली. कसोटी सामन्यांत एकाच दिवसात सर्वाधिक धावा करण्य़ाचा मानही त्याने पटकावला आहे. याआधीचा विक्रमही त्याच्याच नावावर होता.त्याने आपल्या नाबाद खेळीदरम्यान 309 धावांची लयलूट केली. त्याचा सहकारी राहूल द्रविड 65 धावांवर खेळत आहे.
सेहवागच्या या घणाघाती खेळीच्या जोरावर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या 540 धावांना उत्तर देताना भारताने एक गडी गमावून 468 धावा केल्या आहेत.
शुक्रवारी भारताचा पहिला बळी वसीम जाफरच्या रुपाने पडला. त्याने 73 धावा केल्या. सेहवागसोबत त्याने 213 धावांची भागीदारी केली. पॉल हॅरिसच्या गोलंदाजीवर ज्रॅक कॅलिसकडे झेल देऊन तो बाद झाला.
सेहवागचा झंझावात इतका जबरदस्त होता की, क्षेत्ररक्षकांना कुठे उभे करावे हा प्रश्न त्यांच्या कर्णधाराला पडला होता.