कोलकता : न्यायालयात बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या आरोपावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी "बीसीसीआय' आणि मंडळाचे सध्याचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध दाखल केलेली याचिका कोलकत्ता उच्च न्यायालयाने शुक्रवारी सुनावणीसाठी दाखल करून घेतली. न्या. नादिरा पथेरिया यांनी ही याचिका दाखल करून घेतल्यानंतर १८ एप्रिलला पुढील सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
दालमिया यांनी २० जुलै २००७ रोजी ही याचिका सादर केली होती. "बीसीसीआय'चे वरिष्ठ पदाधिकारी निरंजन शहा, शशांक मनोहर आणि चिरायू आमिन यांच्याविरुद्धही याचिका दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, श्री. दालमियां यांनी त्यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत दोन कोटी ९० लाख रुपयांची अफरातफर केल्याच्या आरोपाप्रकरणी दोनच दिवसांपूर्वी त्यांना अटक करण्यात आली होती आणि नंतर लगेचच जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. श्री. दालमिया यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी आरोपपत्रही दाखल केले आहे.