चेन्नई- कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुका 28 मेपूर्वी घेतल्या जातील आणि यासंबंधीची घोषणा येत्या दोन दिवसांत केली जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी सांगितले.
निवडणुकांदरम्यान पोलीस तसेच निमलष्करी दलांची आवश्यकता किती प्रमाणात भासेल याचा आढावा घेण्याचे काम सध्या चालू असल्याचे गोपालस्वामी म्हणाले. तामिळनाडुतील मतदारसंघ पुनर्रचनेच्या कामाला वेग देण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी नरेश गुप्तांसह अनेक उच्चस्तरीय अधिका-यांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी किती मतदार केंद्रे स्थापन करावी लागतील याचा विचारही चालल्याचे निवडणूक आयुक्तांनी सांगितले. एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणुका घेणे क्रमप्राप्त असते. त्यानुसार 28 मेपूर्वी निवडणुका घेतल्या जाणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.