वॉशिंग्टन- राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यास आऊटसोर्सिंग करणा-या कंपन्यांना कर सवलत देणे बंद करणार असल्याचा पुनरुच्चार अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या नामांकनासाठीच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांनी केला आहे. उत्तर कॅरोलिना प्रांतामध्ये घेतलेल्या प्रचारसभेत हिलरी यांनी त्यांची आऊटसोर्सिंगविरोधी भूमिका पुन्हा एकदा मांडली आहे.
करातील पळवाटांवर नियंत्रण आणल्यास रोजगाराच्या संधी अमेरिकेबाहेर न जाता देशातील लोकांना मिळतील. त्याचबरोबर दरवर्षी 50 अब्ज डॉलर्सचा कर टाळणा-या कंपन्यांवरही नियंत्रण येईल, असे हिलरी म्हणाल्या.
कंपन्यांना मिळणा-या कर सवलतींची किंमत अमेरिकेतील सामान्य नागरिकांना मोजावी लागते, असे हिलरी यांनी स्पष्ट केले. बुश प्रशासनाची ही धोरणे अत्यंत चुकीची असल्याची टीका त्यांनी केली.
''उत्तर कॅरोलिना प्रांतातील रोजगाराच्या संधी बुश प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे कमी झाल्या आहेत. मात्र अमेरिकी लोक हे जगातील सर्वात कष्टाळू लोक आहेत. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठीची कौशल्ये ते शिकत आहेत,'' असे हिलरी म्हणाल्या. अमेरिकी कामगार नुसतेच कष्टाळू नाहीत तर जगात सर्वाधिक उत्पादनक्षमही आहेत. मात्र त्यांच्या कष्टाला योग्य तो मोबदला मिळत नसल्याचे त्यांनी नमूद केले.