मुंबई- उत्तर भारतीयांच्या मालकीच्या पाच टॅक्स्यांची आज पहाटे मध्य मुंबई भागात मोडतोड केल्याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अटक झालेल्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी काही संबंध आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या महिन्यापासून मुंबईतील उत्तर भारतीयांविरुद्ध आंदोलन सुरू केले आहे.
आज पहाटे दोन वाजताच्या सुमारास चार मोटारसायकलस्वारांनी तीन टॅक्स्या थांबवून त्यांच्या चालकांकडे ते कोण असल्याची विचारणा केली. टॅक्सी चालक उत्तर भारतीय असल्याचे कळल्यानंतर या चौघांनी टॅक्स्यांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या, असे पोलिसांनी सांगितले. या तीन टॅक्स्यांची मोडतोड करून झाल्यानंतर ते लोक लोअर परळ भागात गेले आणि तेथेही त्यांनी उत्तर भारतीयांच्या दोन टॅक्स्यांची मोडतोड केली.
हा प्रकार गस्त घालणा-या पोलिसांच्या पथकाला कळल्यानंतर त्यांनी लगेचच या चार जणांना ताब्यात घेतले. अटक झालेल्यांची नावे आशिष परब, प्रविण पावसकर, समीर मोरे आणि मिलेश शेलार अशी आहेत.