नवी दिल्ली- हिंदी चित्रपटसृष्टीतली एक प्रतिभावान अभिनेत्री समजली जाणारी काजोल दोन वर्षांच्या खंडानंतर यू, मी और हम या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. लग्नानंतर चित्रपटसृष्टीला रामराम वगैरे ठोकलेला नसला तरी कुटुंबाला प्राधान्य देऊन मोजकेच काम करण्याचा तिचा विचार आहे.
अभिनेता अजय देवगणशी 1999मध्ये विवाहबद्ध झाल्यानंतर काजोलने कभी खुशी कभी गम, फना अशा मोजक्या चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले आहेत.
आता तिचा नवरा अजय देवगण याने दिग्दर्शित केलेला यू,मी और हम येत्या 11 एप्रिलला प्रदर्शित होतो आहे. अजय देवगणचा हा दिग्दर्शक आणि कथालेखक म्हणून पहिलाच चित्रपट आहे.
हा चित्रपट अन्य चित्रपटांपेक्षा कितपत वेगळा आहे या प्रश्नाचं उत्तर देताना काजोल म्हणाली की वाईट ठरावा इतका वेगळा हा चित्रपट निश्चितच नाही. सध्याच्या मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांपेक्षा हा चित्रपट फार वेगळा आहे असं नाही पण तो विशेष आहे हे मात्र नक्की. "या चित्रपटात काम करताना मला कामाचा ताण कधीच जाणवला नाही. उलट एकदम मोकळं वाटत होतं. अगदी घरात असल्यासारखं," तिने सांगितलं.
काजोलने 1992मध्ये बेखुदी या चित्रपटाद्वारे पदार्पण केलं पण तिला खरी ओळख मिळाली ती 1993मध्ये आलेल्या बाझीगरमुळे. त्यानंतरर शाहरुख खानसोबतची तिची जोडी लोकप्रिय झाली आणि या दोघांनी दिलवाले दुल्हनियाँ ले जायेंगे, कुछ कुछ होता है, कबी खुशी कभी गम असे अनेक यशस्वी चित्रपट दिले.
सध्या काजोल पत्नी, आई, अभिनेत्री आणि एका टीव्ही शोची परीक्षक अशा अनेक भुमिकांमध्ये व्यग्र आहे. "सध्या वेळाचं व्यवस्थापन ही माझ्यापुढची सगळ्यात मोठी समस्या आहे. अगदी 15 मिनिटांचा उशीर झाला तरी सगळं वेळापत्रक विस्कटून जातं. अर्थात हे थोडं कठीण असलं तरी अशक्य नाही," तिने सांगितलं.
गेल्या दहा वर्षांत चित्रपटसृष्टीत झालेल्या बदलांविषयी काजोल म्हणाली की बदल तर आवश्यक आहेतच. बदल थांबले तर सगळंच संपून जाईल. गेल्या दहा वर्षांत प्रेक्षक बदलले आहेत. त्यांच्या मागण्या बदलल्या आहेत. त्यामुळे सिनेमाही बदलणारच.
करण जोहरचा पुढचा चित्रपट साइन केला आहेस का, या प्रश्नाला उत्तर देताना काजोल म्हणाली की तिने अद्याप सिनेमा साइन केलेला नाही पण त्याविषयी चर्चा चालली आहे. "करण जोहरचा सिनेमा साइन केली मी ते सगळ्यांना सांगेनच," तिने स्पष्ट केलं.
Source :
IANS