चेन्नई- सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या उभारण्याचा ब्रायन लाराचा विक्रम मोडून नवा इतिहास घडविण्याची विरेंद्र सेहवागची संधी दक्षिण आफ्रिकी गोलंदाज मकाया एनटिनीने हुकवली आहे. येथील एम.ए.चिदंबरम मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांत चाललेल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी सलामीवीर सेहवाग 319 धावा करून एनटिनीच्या गोलंदाजीवर बाद झाला.
कालच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा सेहवागने नाबाद 309 धावा केल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची पिसे काढत केवळ 287 चेंडूंत त्याने कसोटी क्रिकेटमधील सर्वात वेगवान त्रिशतक पूर्ण केले होते. दोन त्रिशतके झळकाऊन लारा आणि सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत बसण्याचा विक्रमही त्याने नोंदविला होताच.
आज उपाहारापर्यंत खेळल्यास लाराचा सर्वाधिक वैयक्तिक धावांचा (400) विक्रम मोडण्याची खात्री सेहवागला होती. मात्र हा इतिहास घडविण्यापासून तो 81 धावा दूर राहिला. अर्थात सेहवागने सर्वाधिक धावसंख्या उभारण्याचा भारतीय विक्रम स्थापन केलाच आहे. स्वत:चाच 309 धावसंख्येचा विक्रम त्याने मोडीत काढला आहे.
सेहवाग बाद झाला तेव्हा भारताच्या 481 धावा झाल्या होत्या. त्याच्या जागी फलंदाजीसाठी आलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर भोपळाही न फोडता बाद झाला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेला सौरव गांगुलीही 24 धावांवर बाद झाला. द्रविडने कसोटी क्रिकेटमधील दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे.