चेन्नई - येथील एम.ए. चिदंबरम मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघांत चाललेल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या आजच्या चौथ्या दिवशी ब्रायन लाराचा विश्वविक्रम मोडण्याची विरेंद्र सेहवागची संधी हुकल्याने हळहळणा-या क्रिकेट रसिकांचे लक्ष माजी कर्णधार राहुल द्रविडने वेधून घेतले आहे. उपाहारानंतर द्रविडने कसोटी क्रिकेटमधील त्याचे 25वे शतकही पूर्ण केले आहे.
कसोटी क्रिकेटमधील दहा हजार धावांचा मैलाचा दगड पार करणारा राहुल द्रविड जगातील सहावा फलंदाज आहे. सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर या भारतीय फलंदाजांनी यापूर्वी हा टप्पा ओलांडलेला आहे. द्रविडने केवळ 120 कसोटी सामन्यांमध्ये दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्येही दहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, राहूल द्रविड या भारतीय फलंदाजांशिवाय विंडीजचा ब्रायन लारा आणि ऑस्ट्रेलियाचे अँलन बॉर्डर व स्टीव्ह वॉ यांनी दहा हजार धावा कसोटी क्रिकेटमध्ये केल्या आहेत.