सायली परांजपे
भाषा लिखित स्वरूपात मांडण्याचे माध्यम म्हणजे लिपी हे जरी खरे असले तरी या लिपीचे महत्त्व एवढ्या पुरते मर्यादित नक्कीच नाही. लिखित स्वरूपातील या अक्षरांच्या रेषा आणि कोनांमध्ये कलावंतांना आकर्षित करून घेण्याचे सामर्थ्य आहे. अर्थात अक्षरांच्या या सामर्थ्याची जाणीव फार कमी लोकांना असते. शाळेत असताना परिक्षेत लिहिलेला पेपर शिक्षकांना नीट वाचता यावा आणि चांगले इंप्रेशन होऊन दोन मार्क जास्त मिळावेत एवढ्या माफक अपेक्षेने मुलांचे अक्षर वाचनीय असावे याकडे पालकांचे लक्ष असते. त्यातून अक्षर वळणदार आणि सुंदर असेल तर त्या मुलाला किंवा मुलीला फळ्यावर सुविचार लिहिणे, सोसायटीतल्या कार्यक्रमात फलक तयार करणे आदी कामांसाठी बोलावले जाते. या पलीकडे जाऊन सुंदर हस्ताक्षर ही एक कला आहे ही जाणीव मात्र फार कमी लोकांना असते.
कॅलीग्राफी अर्थात सुंदर हस्ताक्षर किंवा सुलेखन म्हणून ओळखल्या जाणा-या या कलेची ओळख कला प्रांताशी संबंध नसलेल्या लोकांना आत्ताआत्ताच होऊ लागली आहे. महाराष्ट्रात, किंबहुना भारतात, कॅलीग्राफीचा प्रसार करण्याचे श्रेय जाते ते अच्युत पालव यांना. लग्नपत्रिका किंवा पुस्तकाची मुखपृष्ठे यांच्यापुरती मर्यादित असलेली ही सुलेखनाची कला पालव यांनी घरांच्या भिंतींपासून ते छत्र्यांपर्यंत सर्वत्र नेली आहे. देवनागरी, रोमन किंवा अन्य कोणत्याही लिपीतील रेषा आणि वळणांना कलेच्या उंचीवर नेऊन ठेवल्याचा परिणाम काय होतो हे कळल्यानंतर या कलेला लोकांचा प्रतिसादही मिळू लागला आहे.
पालव मुळात जे. जे. कलामहाविद्यालयाचे विद्यार्थी. कलेचे शिक्षण घेताना त्यांनी कॅलीग्राफीचा एक विषय म्हणून अभ्यास केला होता. त्यातूनच त्यांना या कलेच्या क्षमतेचा अंदाज आला आणि यावर काम केले पाहिजे असे तीव्रतेने वाटू लागले. पालव यांनी मोडी लिपीचाही सखोल अभ्यास केला आहे. पंधराव्या ते सतराव्या शतकाच्या कालखंडातील मोडी लिपीचा अभ्यास करण्यासाठी त्यांना उल्का जाहिरात संस्थेची शिष्यवृत्ती मिळाली होती. या अभ्यासामुळेही कॅलीग्राफीकडे त्यांचा ओढा वाढला आणि त्यांनी त्यात निरनिराळे प्रयोग सुरू केले.
वाचणा-याच्या डोळ्याला सुखावणारे सुंदर व वळणदार अक्षर ही तर सुलेखनाची प्राथमिक बाब झाली. त्यापलीकडे जाऊन अक्षरांचा अर्थ अधोरेखित होईल अशा पद्धतीने पण त्यांची मूळ वळणे कायम ठेवून ती लिहिण्यावर त्यांनी काम केले. साध्या-सरळ अक्षरांत लिहिलेली कविता वाचण्यापेक्षा तिचा अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करणा-या रेषा-वळणांत लिहिलेली कविता वाचणे हा एक वेगळा अनुभव आहे हे पालव यांच्या प्रयोगांमुळे लोकांना हळहळू कळू लागले. यामध्ये कॅलीग्राफीला व्यावसायिक मूल्य देण्याचा त्यांचा सदैव प्रयत्न होता. "कोणतीही कला दीर्घकाळ टिकवायची असेल, तिचा विकास करायचा असेल तर ती व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य केली पाहिजे. नाहीतर तिला भवितव्य नाही. त्यामुळेच कॅलीग्राफीकडे मी केवळ छंद म्हणून न बघता त्यातील व्यावसायिक पैलूंचा विकास करत गेलो," असे पालव आवर्जून सांगतात.
पालव कॅलीग्राफीची प्रदर्शने भरवू लागले. त्यातून त्यांना नवनवीन कल्पना सुचत गेल्या. अगदी चादरी-अभ्र्यांच्या सजावटीपासुन ते बॉडी पेंटिंगपर्यंत अनेक बाबींसाठी सुलेखनाचा उपयोग ते करू लागले. साड्या किंवा शर्टांवर, मग्जवर, घरांच्या भिंतींवर अनेक ठिकाणी सुलेखनाची व्याप्ती पसरली. सुलेखन कोणत्याही लिपीत केले जाऊ शकत असले तरी पालवांची मातृभाषा मराठीत असल्यामुळे आपोआपच मराठी साहित्याचा त्यांच्या कामात अंतर्भाव झाला. मराठी मनात अजरामर स्थान असलेल्या कविंच्या कविता पालव यांच्या सुलेखनाचा साज घेऊन वेगवेगळ्या कॅनव्हासवर उतरू लागल्या. तुकाराम, ज्ञानेश्वर यांचे साहित्य पालवांनी कॅलीग्राफीच्या स्वरूपात आणले.
अन्य काही कलाप्रकारांसोबत कॅलीग्राफीचा मिलाफ साधण्याचे प्रयोगही पालव यांनी केले आहेत. कथ्थक नृत्यांगना आरती परांजपे यांचे नृत्य आणि पालव यांची कॅलीग्राफी असा अभिनव प्रयोग त्यांनी साकारला आहे. त्याचप्रमाणे संतूरवादक राहुल शर्मा यांच्यासोबतही त्यांनी हा प्रयोग केला आहे.
"सुरुवातीला कॅलीग्राफीबाबत लोकांना माहिती नसल्यामुळे ते फारशी उत्सुकता दाखवत नसत. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. लोक आपणहून त्यांच्या नवीन घराच्या एखाद्या भिंतीवर कॅलीग्राफी करून घेण्याची किंवा कॅलीग्राफीची फ्रेम घरात लावण्यासाठी संपर्क साधू लागले," असे पालव यांनी सांगितले. मग हळूहळू कॅलीग्राफीच्या कार्यशाळा घेण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला. पालव यांच्या कार्यशाळांना आज तुफान प्रतिसाद मिळत आहे. मुंबई बाहेरच्या शहरांतून पालक मुलांना कार्यशाळेसाठी आणत आहेत. ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने पालव यांनी कार्यशाळांच्या फ्रँचायझी देण्याचा अनोखा प्रयोग केला आहे.
"मुंबईत वर्षांतून दोनदा होणा-या कार्यशाळेचा लाभ फार थोड्या जणांना घेता येतो. बाहेरच्या शहरांतून या कार्यशाळा घेण्यासाठी प्रचंड मागणी असली तरी मला प्रत्येक वेळा तिथे उपस्थित राहणे शक्य होत नाही. त्यामुळे हा विचार पुढे आला. यात मी नागपूरच्या कला महाविद्यालयातील 20 विद्यार्थ्यांसाठी प्रथम कार्यशाळा घेतली. त्यांना तयार करून त्यांनी वेगवेगळ्या शहरांत मुलांच्या सुलेखन कार्यशाळा घ्यायच्या आणि त्यात शेवटच्या दिवशी मी स्वत मार्गदर्शन करणार अशी साधारण कल्पना होती. या कल्पनेलाही खूप प्रतिसाद मिळाला. नागपूरमध्ये तयार केलेली मुले विदर्भातील अन्य शहरांतच नाही तर थेट रायपूरपर्यंत पोहोचली आहेत. आता रत्नागिरी व नाशिक येथेही अशा पद्धतीची फँचायझी देण्याचे काम चालले आहे," पालव म्हणाले.
पालव यांची कॅलीग्राफीवरील अनेक पुस्तकेही प्रसिद्ध झालेली आहेत. कॅलीग्राफीविषयी प्राथमिक माहिती देणारे कॅलीग्राफी मॅन्युस्क्रिप्ट, कॅलीग्राफीच्या क्षेत्रात थोड्या पुढील टप्प्याला पोहोचलेल्यांसाठी अमूर्त शैलीतील कॅलीग्राफीविषयीचे ऊर्जाक्षरे, कॅलीग्राफीचे व्यावसायिक रूप सादर करणारे अक्षराकृती अशी अनेक पुस्तके पालव यांनी लिहिली आहेत.
आजकाल लहान मुलांमध्ये हस्ताक्षर चांगले असण्याते प्रमाण कमी झाले आहे याबाबत बोलताना पालव यांनी सांगितले की मुळात वाचनाची सवय कमी झाली आहे. मुळात कॅलीग्राफीतील विविध कल्पना सुचण्यासाठी अक्षरे सतत डोळ्यासमोर आली पाहिजेत. वाचनामुळे अक्षरे सतत दिसत राहतात आणि ती कागदावर (किंवा अन्य कॅनव्हासवर) चांगल्या पद्धतीने उमटतात.
कॅलीग्राफी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही पालव यांचे प्रयत्न चालू आहेत. "कॅलीग्राफीची सुरुवात करून आज मला 25 वर्षे झाली आहेत. यावर्षी मी कॅलीग्राफीचा रौप्यमहोत्सव साजरा करत आहे. रौप्यमहोत्सवी वर्षांत कलावंताने समाजातून त्याला मिळालेली कला समाजाला पुन्हा देऊन टाकण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत असे मला वाटते. त्यामुळे मध्यंतरी मी कॅलीग्राफीच्या प्रसारासाठी काश्मीर ते कन्याकुमारी असा दौरा करून आलो," असे ते म्हणाले.
पालव यांनी मुंबईपासून कन्याकुमारीपर्यंत 17 दिवसांचा दौरा केला तर मुंबईपासून काश्मीरपर्यंत 23 दिवसांचा दौरा केला. या टप्प्यातील शक्य तेवढी कला महाविद्यालये निवडून तिथे कॅलीग्राफीच्या दोन-दोन दिवसांच्या कार्यशाळा घेतल्या. या दौ-यामध्ये कॅलीग्राफी केवळ देवनागरी व रोमन भाषांपुरती मर्यादित न ठेवता त्या त्या राज्यांत बोलल्या जाणा-या भाषांच्या लिपी शिकून त्यांत कॅलीग्राफी करण्याचा प्रयोग पालव यांनी या दौ-यात केला. पंजाबमध्ये तर कार्यशाळा कला महाविद्यालयांपुरती मर्यादित न ठेवता चक्क पब्लिक परफॉर्मन्स देण्याचा प्रयोग त्यांनी केला आणि त्याला उदंड प्रतिसादही मिळाला.
केवळ पुस्तकांची मुखपृष्ठे, बॅनर्स किंवा लग्नपत्रिकांपुरती मर्यादित असणा-या कॅलीग्राफीची व्याप्ती अच्युत पालव यांनी वाढवली आहेच. शिवाय केवळ सुंदर हस्ताक्षर ही कॅलीग्राफीची संकल्पनाही त्यांनी व्यापक केली आहे. अक्षरांच्या रेषा-वळणांमधून शब्दांचे अर्थ अधोरेखित करण्याच्या उंचीपर्यंत पालव यांनी कॅलीग्राफीला पोहोचविले आहे. त्यांच्यातील प्रयोगशील कलावंत आणि कार्यशाळा व फ्रँचायझींच्या माध्यमातून वाढत जाणारे त्यांचे शिष्य कलेला आणखी कोणत्या रेषा-वळणांवरून घेऊन जातात याचे उत्तर येणारा काळच देईलच.
Source :
Indiainfo Team