नवी दिल्ली- गेल्या 26 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात चलनफुगवट्यात नोंदविली गेलेली वाढ नाममात्र असल्याची टिप्पणी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी केली आहे. या आठवड्यात चलनफुगवटा 7.61 टक्के नोंदविला गेला होता. त्याअगोदरच्या आठवड्यात चलनफुगवटा 7.57 टक्के होता. त्यामुळे 0.04 टक्क्यांची वाढ ही फारशी उल्लेखनीय नाही असा युक्तीवाद अर्थमंत्र्यांनी केला आहे.
चलनफुगवट्याचा ताजा आकडा दिलासा देणारा असल्याचे चिदंबरम यांनी बातमीदारांना सांगितले. चलनफुगवट्याचा दर स्थिर असल्याचे ते म्हणाले.
महागईचा दर कमी होण्यापूर्वी काही काळ तो सध्याच्या दरावर स्थिर राहील आणि त्यानंतर सरकारने चलनफुगवटा रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा परिणाम दिसू लागेल, असे अर्थमंत्री म्हणाले.
चलनफुगवटा रोखण्यासाठी केंद्र सरकारने चार अत्यावश्यक वस्तूंच्या वायदेबाजारावर बंदी घातली आहे, असे चिदंबरम यांनी सांगितले. सरकारने स्टील उत्पादकांना दर कमी करण्यासाठी तयार केले असून अशाच पद्धतीची विनंती सिमेंट उत्पादकांना करणार असल्याचे ते म्हणाले.