मुंबई - ठाणे लोकसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीतील दोन राजकीय दिग्गजांच्या पुत्रांच्या लढाईकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
शिवसेना सदस्य प्रकाश परांजपे यांच्या निधनानंतर या मतदारसंघात ही पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने या निवडणुकीसाठी प्रकाश परांजपे यांचे पुत्र अनंत परांजपे यांनाच उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे राज्याचे कामगार मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र संजीव नाईक हे देखील राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत. या दोघांसह 16 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यात समाजवादी पार्टीचे चंद्रशेखर शुक्ला, राजदचे महेश राठी यांच्यासह 12 अपक्षांचा समावेश आहे. राठी यांना पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह कंदिल मात्र मिळाले नाही.
या जागेवर कॉंग्रेसने 1984 साली विजय मिळवला होता. आता हा पक्ष राष्ट्रवादीला पाठिंबा देत आहे. 2004 च्या निवडणुकीत कॉंग्रेसला 46.39 टक्के मते मिळाली होती. प्रकाश परांजपे यांनी सलग चार वेळा या जागेवर विजय मिळवला होता.