मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना त्यांच्या तीन मेच्या सभेपूर्वी पोलीसांनी दिलेल्या इशा-यामुळेच त्यांनी काळजी घेऊन आधीच्या सभेपेक्षा या सभेत सौम्य भाषा वापरली, असे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी आज स्पष्ट केले.
राज यांना सभेनंतर पाठवलेल्या नोटीशीबद्दल विचारणा केली असता तीन मेच्या सभेपूर्वीही अशीच नोटीस पाठवल्यामुळे त्यांच्या भाषणात सौम्यपणा आला, असे सांगत त्यांनी पोलीसांच्या कृतीचे समर्थन केले.
ही नोटीस प्रतिबंधात्मक उपायांचा भाग आहे. राज ठाकरे यांच्याकडून भविष्यातही प्रक्षोभक विधाने होऊ नयेत म्हणून ही नोटीस पाठवली असल्याचे ते म्हणाले.
राज ठाकरे यांचे तीन मे चे भाषण अभ्यासासाठी कायदा आणि न्याय विभागाकडे पाठवले असून त्यांचा अहवाल येत्या काही दिवसांत प्राप्त होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.