अहमदाबाद- हरभजन सिंग-श्रीसंत थप्पड प्रकरणाचा चौकशी अहवाल येत्या सोमवारऐवजी मंगळवारी सादर करणार असल्याचे बीसीसीआयने नियुक्त केलेले आयुक्त सुधीर नानावटी यांनी आज सांगितले.
गेल्या 25 एप्रिल रोजी मोहाली येथे झालेल्या एका आयपीएल सामन्यानंतर हरभजनने श्रीसंतच्या थोबाडीत मारल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी बीसीसीआयने नानवटी यांना आयुक्त म्हणून नेमले आहे. हरभजन व श्रीसंत या दोघांचीही काल नानावटी यांच्यासमोर चौकशी झाली. या प्रकरणाची सुनावणी आता पूर्ण झाली असून येत्या सोमवारी नानावटी मंडळाला अहवाल सादर करणार होते. मात्र हा अहवाल मंगळवारी सादर करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पीटीआयला सांगितले.
नानावटी हे अहमदाबादमधील नामवंत वकील आहेत. गुजरात उच्च न्यायालयात सोमवारी त्यांना काम असल्याने अहवाल मंगळवारी सादर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
शिक्षेच्या स्वरूपाविषयी कोणतीही शिफारस या अहवालात करणार नसल्याचेही नानावटी यांनी स्पष्ट केले आहे. हा अहवाल प्रथम बीसीसीआयचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे ठेवला जाईल. मग ते तो मंडळाच्या शिस्तपालन समितीकडे पाठवतील आणि संबंधित खेळांडुना शिक्षा द्यायची की नाही व द्यायची असल्यास कोणत्या स्वरूपाची हे शिस्तपालन समिती ठरवेल, असे त्यांनी सांगितले.
मात्र संबंधित प्रकरणातील गुन्हा हा चौथ्या स्तरावरील गुन्हा आहे आणि यासाठीची शिक्षा आजीवन बंदीपर्यंत जाऊ शकते, असे नानावटी यांनी नमूद केले. मोहम्मद अझरुद्दीन व अजय जाडेजा याच स्तरावरील गुन्ह्यासाठी आजीवन बंदीची शिक्षा भोगत आहेत, असे ते म्हणाले.
Source :
PTI