बंगळूर - कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यात आज दुपारपर्यंत 40 टक्के मतदान झाले होते. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. राज्यातील 11 जिल्ह्यांमधील 89 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे.
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा, त्यांचे दोन्ही पुत्र- राज्याचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी व एचडी रेवण्णा, राज्यसभेतील खासदार व भाजपाचे ज्येष्ठ नेते वेंकय्या नायडू, माजी मुख्यमंत्री एसएम कृष्णा, माजी उपमुख्यमंत्री सिद्धरामय्या आदींनी आज मतदानाचा हक्क बजावला.
सुमारे एक कोटी 73 हजार मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार असून मतदान सुरळितपणे पार पडावे यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया आत्तापर्यंत शांततेत पार पडल्याचे निवडणूक आयोगाच्या एका अधिका-यांनी सांगितले.
तुमकुर, चिकबेल्लापूर, कोलार, बंगळूर शहरी, बंगळूर ग्रामीण, रामनगरा, मंड्या, हसन, कोडागु, म्हैसूर व चामराजनगर या 11 जिल्ह्यांतील 89 विधानसभा मतदारसंघांत आज मतदान होत आहे. एकूण 953 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातील 17 महिला आहेत.
सुमारे एक लाख निवडणूक अधिकारी मतदानावर देखरेख ठेवत आहेत. बंदोबस्तासाठी 58 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
बंगळूर शहर मतदारसंघातही आज मतदान चालले असून मतदारसंघातील 5,685 मतदान केंद्रांवर मिळून 13 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आल्याचे शहर पोलीस आयुक्त एन अच्युत्ता राव यांनी बातमीदारांना सांगितले.
कॉंग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बाब आहे. जुन्या म्हैसूर भागातील जिल्हे पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानले जात असत. मात्र सध्या पक्षाचे या भागातील वर्चस्व लयाला गेले आहे. हे वर्चस्व परत मिळवण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे पण यात त्यांना जनता दल-सेक्युलरचे जबरदस्त आव्हान आहे. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने या भागातील 24 जागा जिंकल्या होत्या. विधानसभेच्या 2004 साली झालेल्या निवडणुकांत जेडीएसने कॉंग्रेसला अनेक धक्के दिले होते
Source :
IANS