वॉशिंग्टन- अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या नामांकनासाठी डेमोक्रॅटिक पक्षामध्ये बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांच्यात चाललेली स्पर्धेचा निकाल लागला आहे, असे अमेरिकी प्रसारमाध्यमांनी जाहीर केले आहे. ओबामा यांनी पक्षातील सुपरडेलिगेट्सच्या पाठिंब्याच्या बाबतीत हिलरी यांना मागे टाकल्यानंतर ही स्पर्धा संपुष्टात आली आहे, असे प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.
उत्तर कॅरोलिना राज्यात ओबामा यांनी हिलरी यांच्यावर मोठ्या फरकाने विजय मिळवला. इंडियाना राज्यात हिलरी विजयी झाल्या असल्या तरी हा विजय निसटता असल्यामुळे त्यांना त्यांची पिछाडी भरून काढण्यासाठी या विजयाचा फारसा उपयोग झालेला नाही. शनिवारी झालेल्या मोजणीनुसार ओबामा यांच्याकडे 276 सुपरडेलिगेट्सचा (पक्षातील महत्त्वाच्या पदाधिका-यांचा) पाठिंबा आहे तर हिलरी यांच्या पाठीशी 271 सुपरडेलिगेट्स आहेत.
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे राष्ट्राध्यक्षपदासाठीचे नामांकन मिळवण्याच्या प्राथमिक निवडणुकीचा पुढील टप्पा पश्चिम व्हर्जिनायात होणार आहे. प्रसारमाध्यमांनी स्पर्धा संपुष्टात आल्याचे जाहीर केले असले तरी हिलरी मात्र या निवडणुकीसाठी प्रचार करत आहेत.
हिलरी पश्चिम व्हर्जिनियामध्ये जिंकतील असा निवडणूकपूर्व चाचण्यांचा कयास आहे. मात्र या निवडणुकीत मोठ्या फरकाने जिंकूनही हिलरी ओबामा यांना मागे टाकू शकतील अशी शक्यता नाही.
ओबामा यांना हिलरी यांच्यापेक्षा अधिक राज्यांमध्ये विजय मिळाला असला आणि त्यांच्या पाठीशी अधिक प्रतिनिधी असले तरी मोठ्या आकाराच्या राज्यांमध्ये आपण जिंकलो असल्यामुळे राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी अधिक सक्षम आहोत, असा दावा हिलरी करत आहेत. अमेरिकेतील गो-या कामगार वर्गाचा आपल्याला पाठिंबा असून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हा वर्ग निर्णायक भूमिका बजावतो, असा युक्तिवादही त्या करत आहेत.
सुपरडेलिगेट्स आणि पक्षातील पदाधिका-यांचे मत उमेदवारी दिली जाण्यात निर्णायक ठरणार आहे कारण स्पष्ट बहुमताचा आकडा ओबामा व हिलरी या दोघांपैकी कोणीच प्राप्त करू शकणार नाही हे उघड आहे.
Source :
IANS