ब्रुसेल्स- चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या म्यानमारमधील परिस्थितीसंदर्भात चर्चा करण्यासाठी युरोपीय संघ उद्या बैठक घेणार आहे. युरोपीय संघाच्या मानवतावादी मदत विभागाचे आयुक्त लुईस मिचेल यांनी ही माहिती दिली.
म्यानमारमधील स्थितीचा आढावा घेणे व युरोपीय संघातील राष्ट्रांना म्यानमारकडून मिळणारा प्रतिसाद वाढविणे या उद्देशाने ही बैठक घेतली जाणार आहे, असे मिचेल यांनी एका पत्रकाद्वारे सांगितले आहे.
म्यानमारमधील परिस्थिती अधिकाधिक वाईट होत चालल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली जाणार आहे. बैठकीनंतर लगेचच म्यानमार दौ-यावर जाण्याचा लुईस यांचा विचार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे. आपदग्रस्त भागात आंतरराष्ट्रीय मदत पोहोचविण्याची माध्यमे ठरविण्यासाठी ते म्यानमार प्रशासनाशी चर्चा करणात असल्याचे संकेत या पत्रकातून देण्यात आले आहेत.
म्यानमारमधील इरावती नदीच्या तांदूळ उत्पादक त्रिभूज प्रदेशात गेल्या तीन मे रोजी आलेल्या चक्रीवादळामुळे संबंधित भागात प्रलय माजला आहे. सरकारी आकडेवारीनुसार सुमारे 62 हजार लोक मरण पावले आहेत तसेच बेपत्ता आहेत.