लंडन- अमेरिकेने मध्यस्थी करूनही पदच्युत न्यायाधिशांना पुन्हा पदावर घेण्याच्या मुद्दयाबाबत पाकिस्तानच्या सत्ताधारी आघाडीमध्ये सहमती होऊ शकलेली नाही. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ पक्षाचे मंत्री या मुद्दयावरून आज राजीनामे देतील अशी शक्यता आहे.
राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी पदच्युत केलेल्या न्यायाधिशांना 12 मेपर्यंत पदावर परत घेतले जावे अशी निर्वाणीची भूमिका पीएमएल-एनने घेतली आहे. अमेरिकेचे असिस्टंट सेक्रेटरी रिचर्ड बाऊचर यांनी पीएमएल-एनचे अध्यक्ष नवाझ शरीफ व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सहअध्यक्ष आसीफ अली झरदारी यांची स्वतंत्ररीत्या भेट घेऊन मतभेद सोडविण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. मात्र शरीफ त्यांच्या 12 मेपर्यंत न्यायाधिशांना पदावर घेण्याच्या मागणीला चिकटून राहिले.
न्यायाधिशांना पदे परत देण्याच्या मुद्दयावरून सत्ताधारी आघाडीतील पीएमएल-एनचे मंत्री मंत्रिमंडळातून बाहेर पडतील. मात्र सरकार कोसळणार नाही, असे पीएमएल-एनच्या सूत्रांनी सांगितले.