सायली परांजपे
टीव्ही आणि त्यापुढची दृकश्राव्य माध्यमं सामान्य माणसांच्या आवाक्यात येऊन इतकी वर्षं लोटली तरी रेडिओ या श्राव्य माध्यमाची जादू फारशी कमी झालेली नाही. आकाशवाणीच्या बातम्यांपासून ते एफएम वाहिन्यांवर सतत बोलणा-या आरजेजपर्यंत सगळ्या गोष्टी आजही ब-यापैकी भाव खाऊन आहेत. टीव्हीप्रमाणे बांधून न ठेवता जाऊ तिथे आपल्यासोबत येणारं हे माध्यम त्याच्या वेगळेपणामुळे आजही अनेकांच्या गळ्यातला ताईत बनून आहे.
अर्थातच रेडिओवरच्या कार्यक्रमांची भाषा ही बाबही अनेकदा चर्चेचा विषय बनतेच. मुंबईतल्या सतराशेसाठ एफएम वाहिन्यांपैकी आकाशवाणीच्या दोन वाहिन्या सोडल्या तर बाकीच्या वाहिन्यांवर मराठी कार्यक्रम कुठेतरी अपवादानेच सादर होतात हा विषयही तीन-चार वर्षांपूर्वी चर्चेला आला आणि तसाच विरला. आकाशवाणीच्या वाहिन्या डीटीएच सेवेवरती उपलब्ध झाल्याने तब्बल 35 देशांत राहणा-या मराठी माणसांना आता त्यांच्या मायबोलीत रेडिओवरचे कार्यक्रम ऐकायला मिळणार अशी जोरदार जाहिरात झाली. परदेशातल्या एका शहरात स्थायिक झालेल्या मराठी लोकांना मात्र या डीटीएचचं फारसं नावीन्य वाटलं नसेल.
हे शहर म्हणजे ऑस्ट्रेलियातलं सिडनी कारण सिडनी शहरातल्या महाराष्ट्रीय लोकांना न चुकता गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ आठवड्यांतून दोनवेळा मराठी बातम्या आणि इतर कार्यक्रम ऐकायला मिळत होतेच. मुंबईतल्या खाजगी एफएम वाहिन्यांना मराठी भाषेतले कार्यक्रम चालवणं शक्य होत नसताना सिडनीतील महाराष्ट्रीय लोकांनी मात्र दहा वर्षांहून अधिक काळ आठवड्यातून दोनवेळा रेडिओवरून मराठी कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचा उपक्रम चालू ठेवला आहे. दर रविवारी सकाळी 11 वाजता आणि मंगळवारी रात्री आठ वाजता सिडनीतल्या महाराष्ट्रीय लोकांच्या घरातले ट्रांझिस्टर्स मराठी भाषेत बोलतात. सिडनीसारख्या शहरात महाराष्ट्रीय मंडळींनी इतक्या वर्षांपासून हा उपक्रम चालू ठेवला आहे.
सिडनीतल्या महाराष्ट्र मंडळाच्या छत्राखाली हा उपक्रम चालत असल्याचे आकाशवाणी सिडनीचे सक्रिय कार्यकर्ते शरद कानिटकर यांनी इंडियाइन्फो.कॉमला ईमेलमार्फत सांगितले. डॉ. पुरुषोत्तम सावरीकर यांच्या पुढाकाराने 26 सप्टेंबर 1996 रोजी आकाशवाणी सिडनीचा शुभारंभ झाला आणि सिडनीतल्या मराठी भाषिकांनी दाखवलेल्या उत्साहामुळे आकाशवाणी सिडनीने अनेक पायंडे पार केले. अनेक भाषांचे कार्यक्रम प्रक्षेपित होणा-या एका रेडिओ स्टेशनवरून आकाशवाणी सिडनीचे प्रक्षेपण होते आणि विशेष म्हणजे तांत्रिक बाबींपासून ते सूत्रसंचालनापर्यंत सगळ्या जबाबदा-या महाराष्ट्र मंडळाचे सदस्य सांभाळतात, असे आकाशवाणी सिडनीचे सध्याचे अध्यक्ष अभय देसवंडीकर यांनी फोनवरच्या संभाषणात सांगितलं.
ऑस्ट्रेलियातल्या रेडिओ स्टेशनने पहिल्यांदा मराठी भाषा ऐकली ती याही अगोदर. पुष्पा आपटे यांनी 1980 साली प्रथम ऑस्ट्रेलियातल्या रेडिओवर मराठी कार्यक्रम सादर केला होता. त्यावेळी गुजराती भाषेतले कार्यक्रम नियमित सुरू होते. या कार्यक्रमांमध्ये मराठी कार्यक्रमांना दहा मिनिटं देण्यात आली होती. या दहा मिनिटांच्या कार्यक्रमांमधला पुष्पा आपटे यांच्यासाठीचा सर्वात स्मरणीय कार्यक्रम म्हणजे 1984 साली भारताच्या पंतप्रधान इंदीरा गांधी यांना वाहिलेली श्रद्धांजली.
सध्या आकाशवाणी सिडनीच्या श्रोत्यांना भारतातील, विशेषत: महाराष्ट्रातल्या, सगळ्या घडामोडी आठवड्याच्या आठवड्याला ऐकायला मिळतात आणि त्याही महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध निवेदिका व पत्रकार डॉ. उज्ज्वला बर्वे यांच्या आवाजात. गेल्या नऊ वर्षांहून अधिक काळ रविवारी सकाळी सिडनीकर मराठी मंडळींना बर्वे यांच्या बातम्या ऐकायला मिळतात. याशिवाय सिडनीतली मराठी मंडळी या रेडिओवरून विविध कार्यक्रम सादर करतात. प्रवासवर्णन, आरोग्यसल्ला, पुस्तक परिचय, लहान मुलांसाठी कार्यक्रम, तरुणांसाठी कार्यक्रम, महाराष्ट्राबाहेरच्या मराठी लोकांचा परिचय करून देणारा कार्यक्रम, मराठी चित्रपट कलावंतांची माहिती करून देणारा कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम आकाशवाणी सिडनीवरून प्रक्षेपित होतात. कोणत्याही रेडिओचा प्राण म्हणजे संगीत. आकाशवाणी सिडनीने गाण्यांची लायब्ररी तयार केली आहे. सुमारे सहाशे गाणी या लायब्ररीत आहेत.
सिडनीला भेट देणा-या मराठी लोकांच्या मुलाखती हा आकाशवाणी सिडनीवरून प्रक्षेपित होणा-या कार्यक्रमांतील महत्त्वाचा भाग आहे. सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर, ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे, डॉ. मोहन आगाशे, अतुल परचुरे, निवेदक सुधीर गाडगीळ, कीर्तनकार चारुदत्त आफळे, नेमबाज अंजली वेदपाठक, क्रिकेट समालोचक हर्षा भोगले आदी मान्यवरांच्या मुलाखती आकाशवाणी सिडनीवरून प्रक्षेपित झाल्या आहेत.
आकाशवाणी सिडनीवरून प्रक्षेपित होणा-या कार्यक्रमांचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे तिथल्या मराठी मंडळींशी संबंधित बातम्या रेडिओवरून दिल्या जातात. कोणाला गाडी विकायची असेल तर आकाशवाणी सिडनी इतरांपर्यंत ती माहिती पोहोचविण्याचे माध्यम बनते. आई-वडिलांना किंवा अन्य ज्येष्ठ नागरिकांना भारतात पाठविण्यासाठी सोबत हवी असले तर त्याचीही घोषणा आकाशवाणी सिडनीवरून केली जाऊ शकते, असे देसवंडीकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सिडनीतल्या मराठी भाषिकांना एकमेकांशी जोडून ठेवण्याचे कामही आकाशवाणी करते. त्यासोबतच वाढदिवसांच्या शुभेच्छा वगैरेही आकाशवाणीवरून देण्याची सोय आहे. यातून हा उपक्रम चालू ठेवण्यासाठी आवश्यक तो पैसाही मिळत असल्याचे देसवंडीकर यांनी नमूद केले.
आकाशवाणी सिडनीचे प्रक्षेपण ज्या स्टुडिओतून होते त्या स्टुडिओचे साप्ताहिक भाडे 75 ऑस्ट्रेलियन डॉलर्स एवढे आहे. शिवाय अडीचशे डॉलर्सची वार्षिक वर्गणीही द्यावी लागते. यासाठी जाहिरातींतून मिळणारे उत्पन्न उपयोगी पडते. शिवाय आकाशवाणी सिडनीसाठी आश्रयदाता योजनाही सुरू करण्यात आली असून त्याला मराठी लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे शरद कानिटकर यांनी ईमेलद्वारा झालेल्या संभाषणात सांगितले. या योजनेमध्ये निधी संकलनासाठी मराठी चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित केले जाते, असे ते म्हणाले. येत्या जून महिन्यातही सिडनीतील मराठी मंडळींसाठी वळू या गाजलेल्या मराठी चित्रपटाचं स्क्रीनिंग होणार आहे. सुमारे चारशे-पाचशे मराठी लोक हा चित्रपट बघणार आहेत. त्यामुळे आकाशवाणी सिडनीला यातून भरीव आर्थिक मदत मिळते, असे कानिटकर यांनी नमूद केले.
जागतिकीकरणाच्या रेट्यात जग जवळ येत चालले आहे, भाषांच्या सीमा गळून पडत आहेत हे खरे असले तरी प्रत्येक भाषेची एक स्वतंत्र ओळख असते. त्यातूनही मातृभाषेचं संवर्धन ही तर केवळ सांस्कृतिकच नव्हे तर माणसाची भावनिक गरजही असते. व्यवहाराच्या सुलभीकरणासाठी जागतिक भाषांचा स्वीकार करण्यात गैर काहीच नाही. उलट ते आवश्यक आहे. मात्र या परिस्थितीही प्रादेशिक भाषांची जपणूक केली तर माणसाच्या सांस्कृतिक आणि भावनिक समृद्धीसाठी ते उपकारकच आहे. सिडनीत राहणा-या मराठी भाषिकांसाठी आकाशवाणी सिडनी ब-याच अंशी ते काम करत आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.
Source :
Indiainfo Team