यांगून- चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या म्यानमारमधील अनेक भाग अद्याप उर्वरित देशापासून संपर्क तुटलेल्या अवस्थेत आहेत, असे अधिकृत सूत्रांनी सरकारी माध्यमांना सांगितले. मात्र परदेशी मदत व बचाव पथकांना देशात काम करण्याची परवानगी न देण्यावर सरकार अद्याप ठाम असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.
बहुतांश चक्रीवादळग्रस्त भागांना सरकारी अधिका-यांनी भेट दिली आहे. मात्र अनेक भाग अद्यापही संपर्काच्या टप्प्यात आलेले नाहीत, असे देशाचे आर्थिक विकास मंत्री सोए था यांनी काल सांगितले. ज्या भागांमध्ये हेलीकॉप्टर्स पोहोचू शकत नाहीत त्या भागांमध्ये आवश्यक वस्तू हेलीकॉप्टरमधून टाकण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रसंघ आणि विविध राष्ट्रांच्या सरकारांनी केलेल्या मदतीबाबत सोए था यांनी त्यांचे आभार मानले पण मदत व बचाव कार्य स्थानिक लोकांमार्फतच पार पाडले जाईल हे स्पष्ट केले.
म्यानमार सरकारने पुनर्वसनाच्या कामावर आत्तापर्यंत 20 दशलक्ष क्याट्स (सुमारे 18 दशलक्ष अमेरिकी डॉलर्स) खर्च केले असून 21 मदत शिबीरे स्थापन करण्यात आली आहेत, असेही सोए था यांनी सांगितले.