नवी दिल्ली - देशातील शेतक-यांच्या दृष्टीने वरदान असणा-या नैऋत्य मोसमी पावसाचे यंदा पाच दिवस आधीच भारतीय भूमीवर आगमन झाले आहे. यंदा या मान्सूनने दक्षिण अंदमानचा समुद्र आणि दक्षिण पूर्वेकडील बंगालच्या उपसागरात आपले आगमन केले आहे.
मान्सूनच्या आगमनामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर गेल्या दोन दिवसांपासून तुरळक ते जोरदार पाऊस पडत असून मोसमी वारेही वाहायला लागले आहेत. मान्सूनसाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने या भागावर तो लवकरच स्थिर होईल, असा अंदाज भारतीय हवामानखात्याने वर्तवला आहे.
देशातील 23 कोटी शेतक-यांचा उदरनिर्वाह ज्यावर चालतो त्या मान्सूनचे यंदाही प्रमाण 99 टक्क्यांच्या आसपास राहणार असल्याचा दिलासादायक अंदाजही वेधशाळेने व्यक्त केल्याने शेतक-यांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. नेहमी एक जूनच्या आसपास येणारा हा पाऊस केरळच्या किनारपट्टीवर यंदा एक आठवडा आधी धडकणार असल्याचाही अंदाज आहे.