बिजिंग - चीनला आज बसलेल्या भूकंपाच्या जबरदस्त धक्क्यात आठ हजारांहून अधिक जण ठार झाले असून एका शाळेच्या ढिगा-याखाली 900 विद्यार्थी अडकून पडले आहेत. सोमवारी दुपारी बसलेल्या या धक्क्यात बिचुआन भागात 10 हजारांहून अधिक नागरिक जखमी झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7 पूर्णांक 8 मोजण्यात आली.
चीनच्या मध्य भागाला या भूकंपाची प्रामुख्याने झळ पोहोचली असली तरी हा धक्का इतका जबरदस्त होता की त्यामुळे त्यापासून हजारो मैलांवर असलेल्या बिजिंग आणि शांघायसारख्या शहरातील नागरिकांनी आपापपली घरे आणि कार्यायले सोडून रस्त्यांवर धाव घेतली. या भूकंपाचा धक्का पाकिस्तान, व्हिएतनाम आणि थायलंडला जाणवला.
ढिगा-याखाली सापडलेल्या मुलांबद्दल अधिक माहिती देण्यास मात्र चीनची अधिकृत वृत्तसंस्था असलेल्या झिनुआने नकार दिला.
चीनच्या चेंगडू भागाला दुपारी अडिचच्या सुमारास हा धक्का जाणवला. या धक्क्यामुळे चीनमधील दूरध्वनी सेवा व वीजसेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली.
या धक्क्याने भूमिगत जलवाहिन्याही उद्दध्वस्त झाल्या असून अनेक इमारतींना मोठ्या प्रमाणावर तडे गेले आहेत.
चीनमध्ये तीन महिन्यांनंतर होणा-या ऑलिंपिकच्या तयारीत असलेल्या बिजींग शहरातील इमारतींनाही या भूकंपाने मोठी हानी पोहोचवली आहे. तेथील अनेक गगनचुंबी इमारती रिकाम्या केल्या गेल्या आहेत. शाघायमध्येही तिच परिस्थिती असून रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.
चीनमधील या प्रलंयकारी भूकंपानंतर तेथे पावसाचाही अंदाज वर्तवला गेला आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष हू जिंताओ यांनी या आपत्तीत जखमी झालेल्यांना तात्काळ मदत देण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधान वेन जिआबाओ हेदेखील परिस्थितीवर लक्ष ठेऊन असून चीनी पीपल्स लिबरेशन आर्मीला मदत आणि बचाव कार्यासाठी जुंपण्यात आले आहे.
Source :
Agencies