मुंबई - सोमालियन चाच्यांनी अपहरण केलेल्या जॉर्डनच्या मालवाहू जहाजाचा पत्ता लावण्यात यश आले आहे. या जहाजाचे सोमालियाच्या किना-याजवळ अपहरण केले होते. त्यावर 10 भारतीय खलाशी आहेत.
एमव्ही व्हिक्टोरिया असे या जहाजाचे नाव असून सोमालियाची राजधानी मोघादिशूपासून 600 किलोमीटर अंतरावर असल्याचे कळले आहे. याबाबत अद्याप तरी कोणतीही अधिका माहिती हाती आलेली नाही.
अन्नटंचाईला तोंड देत असलेल्या सोमालियाकडे मदत घेऊन मुंबईहून हे जहाज निघाले होते. त्यावर 42 हजार टन साखरेचा साठा आहे. नौकानयन महासंचालनालयाच्या अधिका-यांनी ही माहिती दिली.
या जहाजाच्या शोधासाठी भारतीय नौदलही कार्यरत झाले असून आयएनएस दिल्ली या जहाजाला पुढील कारवाईसाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चाच्यांकडेही मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आहे.