कोलकाता - शेतक-यांना कृषी उत्पादनांच्या खरेदीसाठी कर्ज नाकारण्याच्या भारतीय स्टेट बँकेच्या निर्णयाचा कर्मचारी संघटनेने निषेध केला असून त्याचा कृषी क्षेत्रावर विपरित परिणाम होऊ शकतो, असा इशाराही दिला आहे.
बँकेने घेतलेल्या या निर्णयाची आम्ही गंभीरतेने दखल घेतली असल्याचे कर्मचारी संघटनेचे मुख्य सचिव अशोक दत्त यांनी सांगितले. पॉवर टिल्लर, ट्रॅक्टर आणि इतर यांत्रिक सामग्रीसाठी यापुढे कर्ज न देण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे.
या निर्णयामुळे शेतक-यांना सावकारांकडे जाण्यावाचून पर्याय उरणार नाही, असेही दत्त यांनी निवेदनात म्हटले आहे. बँकेने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि देशातील सर्वात मोठी व्यावसायिक बँक म्हणून असलेले आपले उत्तरदायित्व निभवावे, असे आवाहनही दत्त यांनी केले आहे.