शुभांगी खापरेमुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर मिळणा-या चीनी बनावटीच्या खेळण्यांप्रमाणे आहे. ही खेळणी दिसायला तर आकर्षक दिसतात मात्र ती फार काळ टिकत नाहीत, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे, अशा शब्दांत शिवसेनेने मनसेवर टीका केली आहे. आगामी निवडणुकीत मनसेपासून शिवसेनेला कोणताही धोका नसून शिवसेना कार्यकर्त्यांना असली आणि नकली यातील फरक कळतो, असा टोलाही शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे. ते दैनिक भास्कर/डीएनएसोबत बोलत होते.
शिवसेनेत फूटीचा प्रश्नच निर्माण होत नाही. 2007 साली मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने आपली शक्ती दाखवून दिली आहे, त्याचबरोबर पुढील वर्षी होणा-या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या शक्तीचा सर्वांना प्रत्यय येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणीही यावे आणि कोणीही जावे अशी शिवसेना ही काही धर्मशाळा नाही, असेही त्यांनी राज ठाकरेंना पुन्हा पक्षात प्रवेश देणार का, या प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.
वडापाव खायला मलादेखील आवडतो, त्याचप्रमाणे माझ्या मुलालाही तो आवडतो. त्यामुळे वडापाव खाण्यात लाज ती कसली असा प्रश्नही त्यांनी विचारला. वडापावच्या मागे लपलेले प्रचंड अर्थकारण विरोधी पक्षांच्या नजरेत का येत नाही, असे ठाकरे म्हणाले.