मुंबई - चित्रपट अभिनेता संजय दत्त व त्याची पत्नी मान्यता यांनी त्यांच्या विवाहासंदर्भात दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवरील निर्णय मुंबईतील स्थानिक न्यायालयाने आज 28 मेपर्यंत राखून ठेवला. याप्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन. सरदेसाई यांनी याबाबत 28 मे रोजी निर्णय दिला जाईल, असे सांगितले.
मान्यताला तिचा आधीचा पती मेराजकडून घटस्फोट हवा होता. मुस्लीम कायद्याप्रमाणे काझीचा निर्णय विवाह अथवा घटस्फोटांच्या बाबतीत अंतिम धरला जातो. हे मेराजलाही मान्य असल्याचे संजयचे वकील अँडव्होकेट शिवदे यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र मेराज आणि मान्यता यांचा घटस्फोट घडवून आणणारा काझी बोगस असल्याचा दावा मेराजच्या वकिलांनी केला आहे.
संजय दत्तने मान्यतासोबत गोव्यात विवाह केल्यानंतर मान्यताचा पती मेराजने या विवाहाला आव्हान दिले होते. मेराज सध्या एका खंडणीवसुलीच्या प्रकरणात तुरुंगात आहे. मान्यताने काझीमार्फत पाठवलेली घटस्फोटाची नोटीस आपण स्वीकारली नसल्याचे तसेच या घटस्फोटाला आपण कधीही परवानगी दिली नसल्याचेही मेराजने म्हटले आहे.