मुंबई- सुशांत सिंग ओळखला जातो तो त्याच्या नकारात्मक भुमिकांसाठी. अर्थात त्याला या साच्यात अडकून पडण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणूनच त्याने आता विनोदी ढंगाच्या भूमिका करायचे ठरवले आहे. सुशांत सध्या त्याच्या हुल्ला व इडियट बॉक्स या विनोदी चित्रपटांच्या प्रदर्शनाची वाट बघतोय.
"मला साच्यात अडकून पडण्याची इच्छा नाही. वैविध्यपूर्ण भूमिका करायच्या आहेत. मी खलनायकी भूमिकांसोबतच सकारात्मक व्यक्तीरेखाही रंगवल्या आहेत आणि माझे व्यक्तीमत्त्वही दोन्ही प्रकारच्या व्यक्तीरेखांसाठी योग्य आहे. विनोदी भूमिकाही मी खूप एंजॉय केल्या," असं सुशांतने सांगितलं.
इडियट बॉक्समध्ये सुशांतने एका टीव्ही वाहिनीच्या क्रिएटिव्ह हेडची भूमिका केली आहे तर हुल्लामध्ये एका स्टॉकब्रोकरची. त्याची सर्वात लक्षात राहणारी भूमिका म्हणजे राम गोपाल वर्माच्या जंगलमधील दुर्गा नारायण चौधरीची. त्याला या भुमिकेसाठी आयफा पुरस्कारही मिळाला होता. मात्र सुशांतला त्याची सर्वात आवडणारी भूमिका विचारली असता तो राजकुमार संतोषींच्या लिजंड ऑफ भगतसिंगमधील सुखदेवच्या भूमिकेचा उल्लेख करतो.
मणी रत्नम यांच्या मुखबीर चित्रपटातही सुशांत सिंग खलनायकाची भूमिका करतोय. यात तो हैदराबादच्या एका अंडरवर्ल्ड गँगमधील शूटरची भूमिका करतोय.