मुंबई - ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना गुंड कुख्यात एजाज लकडावाला याने खंडणीसाठी धमकावल्याच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. राजकुमार संतोषी यांना पाच कोटी रुपयांच्या खंडणीसाठी हे गुंड धमकावत आहेत.
मी स्वत: या धमक्या ऐकलेल्या नाहीत, मात्र माझ्या कार्यालयातील काही जणांनी धमक्यांचे हे दूरध्वनी घेतले आहेत, असे संतोषी यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितले. चित्रपट क्षेत्रातील इतरांप्रमाणे मी देखील स्वत:ला कामात बुडवून घेतले आहे. त्यामुळे मला कशाला हे दूरध्वनी केले जात आहेत, हे कळत नाही. मात्र गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त राकेश मारिया यांनी वृत्तपत्रांमध्ये या धमक्यांचे गांभीर्य सांगितल्यानंतर मात्र मी चिंतेत पडलो आहे, असे ते म्हणाले.